धुळे : धुळ्यात एका 80 वर्षीय महिलेचा मृतदेह एका गटातील कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही वृद्ध महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यांचे कुटुंबिय गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. त्यानंतर आजीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कस्तुराबाई वानखेडे असे या मृत महिलेचे नाव आहे.
दोन दिवसांपूर्वी कस्तुराबाई या विष्णूनगर देवपूर येथून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचे कुटुंबिय त्यांचा शोध घेत होते. पण कस्तुराबाई यांचा तपास लागत नव्हता. अखेर कुटुंबियांनी देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस आणि कुटुंबिय आजींचा शोध घेतच होते. तसेच परिसरातील इतर नागरिक वानखेडे कुटुंबियांचे नातेवाईक सर्वच आजीचा शोध घेत होते. या दरम्यान आज (12 सप्टेंबर) दुपारच्या सुमारास आंबेडकर शाळेजवळ चंदन नगर परिसरात एका गटारीत एका वृद्धेचा मृतदेह आढळला.
संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तिथे दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलीस अनेक बाजूंनी घटनेचा तपास करत आहेत.















