
गणेश विसर्जनानंतर वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर करण्यात येईल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ओवेसी यांच्यासोबत संबंध चांगले आहेत. इतरांसोबत आमची काहीही चर्चा झालेली नाही. सध्या ओवेसी यांच्याकडून कोणताही निरोप आलेला नाही. काँग्रेससोबत आम्ही चर्चा करत नाही.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या टीकेला प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचं नाव न घेता उत्तर दिलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला फक्त आठ जागा देऊ केल्या असल्याने इम्तियाज जलील यांनी सारं काही आलबेल नसल्याचं म्हटलं होतं. मात्र एमआएमची युती ओवेसी यांच्यासोबत झाली आहे ते सांगेपर्यंत युती कायम आहे असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
आता आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेतही प्रकाश आंबेडकर यांनी, “आम्ही काँग्रेससोबत कोणतीही चर्चा करणार नाही. ओवेसी यांच्याकडून काय निरोप येतो त्याची वाट बघणार आहोत. ओवेसी यांच्यासोबत आमचे चांगले संबंध आहेत. इतरांसोबत युतीची चर्चा करणार नाही” असं म्हटलं आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचं काय होणार हा सस्पेन्स कायम आहे. काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उत्तर दिलं होतं. वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता असेल असं मुख्यमंत्री म्हटले होते. ज्यावर प्रकाश आंबेडकर यांनी “वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता नाही तर मुख्यमंत्री होईल” असं उत्तर दिलं होतं. आज झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी इम्तियाज जलील यांचा उल्लेख न करता ओवेसी यांच्यासोबत आमचे संबंध चांगले आहेत. त्यांच्याकडून कोणताही निरोप आला नसल्याचं म्हटलं आहे.