ठाणे : ठाणे महापालिकेकडून सध्या शहरातील अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहिम सुरु आहे. याच दरम्यान, रस्त्यावर बसलेल्या एका भाजी विक्रेत्याने सहाय्यक आयुक्तांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची तीन बोटं छाटली गेली असून त्यांच्या सुरक्षारक्षकाचे देखील बोट छाटले गेले आहे. या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरजित यादव (वय 45) असं या हल्लेखोर भाजीविक्रेत्याचं नाव आहे. आज संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे, 3 वर्षांपूर्वीच याच अमरजित यादवर हल्ल्याचा गुन्हा दाखल होता. या हल्लेखोराला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे महापालिकेकडून सध्या शहरातील अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहिम उघडली आहे. आज संध्याकाळी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांच्या पथकाने घोडबंदर भागातील कासारवडवली येथील मार्केटवर कारवाई केली. त्यावेळी फेरीवाल्यांनी त्यांचे रस्ते अडवले. यावेळी फेरीवाले आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष पेटला.
त्याचवेळी यादव नावाच्या या भाजीविक्रेत्याने रागाच्या भरात पिंगळे यांच्यावर चाकू फेकून मारला. पिंगळे यांनी तो हल्ला रोखण्यासाठी हाताने अडकवला. पण, यात त्यांची तीन बोट छाटली गेली आणि जागेवरच तुटून पडली.त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या सुरक्षारक्षकाने धाव घेतली असता आरोपी यादवने त्याच्यावरही वार केले. या हल्ल्यात त्याचेही बोट तुटले.