जळगाव- कोरोनाच्या हाहाःकाराने त्रस्त असलेल्या जळगावकरांमध्ये प्रशासनाच्या गलथान अन् बेजबाबदार कारभारामुळे अधिकच भीती निर्माण झाली आहे. जिल्हा कोविड रुग्णालयाच्या शौचालयात एका 82 वर्षीय वृद्धा मृतावस्थेत आढळून आल्याने जिल्हयातील जनता हादरली आहे. प्रशासनाने मात्र आपले अपयश झाकण्यासाठी केवळ डिनसह डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करत ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ सारखा प्रकार करून जबाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे.
प्रशासनाचे अपयश लपविण्यासाठीच डीन खैरे यांच्यासह दोन डॉक्टरांवर कारवाईचा बडगा !
जळगाव जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला शरमेनं मान खाली घालावी लागली असा दुदैवी प्रकार जळगाव शहरातील शासकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात उघडकीस आल्याने प्रशासनाचे अपयश समोर आले या प्रकरणात सामूहिक जबाबदारी निश्चित करून, कसून चौकशी अंती दोषींवर कारवाई होणे अपेक्षित असतांना प्रशासनाने स्वतःचे अपयश लपविण्यासाठी घाई घाई घाई ने फक्त डीन डॉ. खैरे यांच्यासह सहाय्य्क प्राध्यापक डॉ. सुयोग चौधरी, कनिष्ठ निवासी डॉ. कल्पना धनकवार या तिघांचे निलंबनाचे आदेश काढले आहे असा सुर समाजमनात उमटत आहे.
येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात बेपत्ता झालेल्या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह शौचालयात आढळुन आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली होती. जिल्हाधिकारी यांनी देखील या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली होती.रात्री उशिरा पर्यंत जिल्हापेठ पोलिसात वॉर्ड क्रमांक ७ च्या ड्युटी वर असलेल्या स्टाफ विरुद्ध गुन्हा दाखलही करण्यात आला असतांना आज तात्काळ तिघांच्या निलंबन झाल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला मिळाल्याने ‘चोर सोडून संन्याशाला फाशी, असे अनेकांच्या तोंडी आपसूक आले.
दोषींवर निलंबनाची कारवाई अटळ असल्याचे संकेत आरोग्य विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी कालच दिले होते.प्रतीक्षा होती ती फक्त जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांचा अहवाल शासनाला प्राप्त होण्याची…तो अहवालही शासनाला मिळाल्याने डीन डॉ.खैरे यांच्यासह दोन जणांचे राज्यपालांच्या आदेशान्वय उपसचिव सुरेंद्र चानकर यांनी निलंबनाचे आदेश काढले.मात्र या निलंबनाच्या कारवाई नंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्या वृद्ध महिलेच्या मृत्यूला फक्त हे तिघेच जबाबदार आहेत का ?, ड्युटीवर असलेल्या कर्मचारी स्टाफ हे यात दोषी नाहीत का?, इतर प्राध्यापक, निवासी वैद्यकीय अधिकारी यात दोषी नाहीत का?, एवढा कामाचा व्याप असतांना डीन यांची शौचालय दररोज तपासणी करण्याची जबाबदारी आहे का? यात इतर कर्मचारी दोषी नाहीत का ?, जिल्हाधिकारी यांनी नेमलेले नोडल अधिकारी यांनी प्रकरणात हलगर्जी पणा केलेला नाही का?तक्रार प्राप्त झाल्यावर गंभीर दखल न घेता साधा तपासही पोलिसांनी वॉर्ड पासून केला नाही यात पोलीस प्रशासनाची हलगर्जी पणा नाही का? शौचालय स्वच्छता करण्यासाठी सात दिवस एकही स्वछता कर्मचारी फिरकला नाही का?, असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना उपस्थित होत असतांना निव्वळ डीन यांच्यासह दोन जणांवर निलंबनाची कारवाई निश्चित करणे हे प्रशासनाचे अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्नच आहे असंच म्हणावे लागेल.
कोविड रुग्णालयातील आजींच्या मृत्यूने जिल्हावासियांचे मन सुन्न झाले असतांना प्रशासनाने सखोल चौकशी न करता तोडकी कारवाई करत फक्त या तिघांनाच ‘बळीचा बकरा’ बनवल्या गेल्याची भावना निर्माण झाली आहे.
सामूहिक जबाबदारी निश्चित होणे अपेक्षित
येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात बेपत्ता झालेल्या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह शौचालयात आढळुन आल्याप्रकरणी एकट्या डीन डॉ.भास्कर खैरे यांच्यासह इतर दोन डॉक्टरांना दोषी न ठरवता या प्रकरणी सामूहिक जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.
डीन असल्याने पालकत्व डॉ.खैरे यांचेही आहेच
शासकीय महाविद्यालय येथिल डीन डॉ. खैरे असल्याने प्रथम पालकत्व त्यांचे येते यात शंका नाही.ते या संतापजनक घटनेत एकदम निर्दोष असल्याचे समर्थन देखील करता येणार नाही परंतु ते एकटेच व सोबतचे दोन डॉक्टर हेच दोषी ठरवणे देखील न्यायाचे होणार नाही म्हणून आजीच्या मृत्यूची दुर्दैवी घटना समोर आल्यापासून ‘दैनिक नजरकैद’ सामूहिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी करत आहे.येत्या दिवसात प्रशासन याबाबत विचार करून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करेल का हे महत्वाचे ठरणार आहे.