कजगाव, ता. भडगाव – महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागाने ३० सप्टेंबर २०१९ रोजी जाहीर केलेल्या “महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९” च्या अनुषंगाने शासनाची कर्जमुक्तीची प्रक्रिया चालू असून सदर च्या प्रक्रियेला प्रशासकीय अडचणींमुळे काही महिन्यांचा कालावधी खर्ची पडला आहे. राज्यातील जिल्हा सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ह्यांनी ३० सप्टेंबर २०१९ ते कर्जमुक्ती योजनेच्या मूळ अंमलबजावणी पर्यंतच्या कालावधीसाठी पात्र लाभार्थ्यांच्या थकीत रकमेवर कुठल्याही प्रकारे व्याज आकारू नये असा आदेश महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागाने १७ जानेवारी २०२० रोजी निर्गमित केला होता. परंतु, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, गुढे ता. भडगाव, जि. जळगाव ह्या संस्थेने भ्रष्टाचाराची परिसीमा गाठत प्रत्येक शेतकऱ्याकडून प्रत्येकी हजारो रुपयांचे एकूण २५ ते ३० लाख रकमेचे बेकायदेशीर व्याज वसूल केले आहे, किंबहुना अजूनही वसुली करत आहेत. शेतकरी भोळा असल्या कारणाने सदर विषयाची जाणीव कोणालाही नव्हती, परंतु गुढे – वडजी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव धनाजी महाजन ह्यांनी सदर विषयात पुढाकार घेऊन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. अरुण प्रकाशजी, जिल्हा दंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे तसेच पोलीस आयुक्त जळगाव ह्यांच्याकडे लेखी तक्रार देऊन उपरोक्त संस्थेच्या चेअरमन व सचिवांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.