जळगाव, (प्रतिनिधी) – येथील कोविड रुग्णालयात नियुक्त केलेले नोडल अधिकारी श्री. डि.आर.लोखंडे कर्तव्य पार पाडण्यात ‘सपशेल अपयशी’ ठरले असून त्यांचा तात्काळ पदभार काढून नवीन सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी आज पालकमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली असून याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देखील दिले आहे.
दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, काल दि.१० रोजी एका कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह प्रसाधन गृहात आढळून आल्याचे वृत्त आज दि.११रोजी विविध वृत्तपत्र माध्यमातून वाचल्यानंतर खूप संताप झाला.आरोग्य यंत्रणा तर ढासळलेली आहेच हे अगोदरच सर्वाना माहिती आहे.आपण या कोविड रुग्णालयाच्या विविध जबाबदाऱ्या व नियंत्रण ठेवण्यासाठी आपण दि.रा.लोखंडे यांच्यासह इतर नोडल अधिकाऱ्यांचे नियुक्त्या केल्या होत्या.मात्र या घटनेवरुन लक्षात येते की नोडल अधिकारी देखील या ठिकाणी सपशेल अपयशी ठरले असून तात्काळ कर्तव्यात कसूर केला म्हणून नोडल अधिकारी यांच्यावर कारवाई करावी व नोडल अधिकारी पदावरून हटविण्यात यावे व नवीन सक्षम अधिकारी यांची नेमणूक करावी अशी मागणी विजय निकम यांनी केली आहे.