रावेर,(विनोद कोळी)- सावदा शहरात झालेल्या दगडफेकीची घटना ताजी असताना रावेर शहरातील भोईवाडा परिसरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही,घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांनी रावेरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तर रावेर येथील सहायक पोलीस निरिक्षक श्री. अडसूळ आणि त्यांच्या सहकार्यांनी स्थिती नियंत्रणात आणली आहे.दरम्यान दगडफेक करणाऱ्या १२ संशिताना ताब्यात घेण्यात आले आहे.
काल रात्री रावेर शहरातून काढण्यात आलेली शोभायात्रा दगडफेकीनंतर थांबविण्यात आली होती परिसरात पोलिसांनी तात्काळ कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सध्या वातावरण नियंत्रणात असून कुणीही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अयोध्येत नव्यानं बांधण्यात आलेल्या श्री राम मंदिरात आज २२ जानेवारीला प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतं आहे. याचे औचित्य साधून २१ जानेवारी रविवार रोजी रावेर शहरातील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी या शोभायात्रेला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी पूजन करतांनाच वाजंत्रीच्या तालावर ठेका देखील धरला होता.
दरम्यान, यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास ही शोभायात्रा भोईवाडा परिसरातून पुढे नाला भागात येत असतांना अज्ञात टवळाखोरांनी जोरदार दगडफेक सुरू केली. यामुळे शोभायात्रेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या शोभायात्रेच्या दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त होताच. यामुळे येथे असलेल्या पोलिसांनी तात्काळ दगडफेक करणार्यांचा शोध सुरू केला आहे. परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून कुणीही कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.