एरंडोल : एरंडोल तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर आली असून येथील एका मुलींच्या वस्तीगृहातील पाच मुलींचे लैंगिक शोषण तेथील काळजीवाहकानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. गणेश शिवाजी पंडित असे या नराधम काळजीवाहकाचे नाव असून हा प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना?
एरंडोल तालुक्यात वस्तीगृहातील मुलींची काळजी गणेश शिवाजी पंडित यांच्याकडे होते. मात्र रक्षकच भक्षक निघाला असे दिसून आले आहे. हे प्रकरण वस्तीगृहातील त्याची अधीक्षिका पत्नी व सचिवाला माहित झाले. मात्र त्यांनी देखील या गंभीर घटनेंकडे कानाडोळा करून एक प्रकारे काळजीवाहक गणेश पंडित याला सहकार्य केले. त्यामुळे या गंभीर घटनेत आता गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रकरण समोर आले आहे.
सदर पाचही मुलींवर ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ या दरम्यान एरंडोल तालुक्यातील एका गावातील मुलींचे वसतीगृहात लैंगिक अत्याचार झाले आहेत. पाच बालिका तेथील वसतीगृहात अभिरक्षेत असतांना सदर वसतीगृहातील काळजी वाहक गणेश शिवाजी पंडीत याने पाचही बालिकांशी उपरोक्त काळात वेळोवेळी लैंगीक छळवणूक करुन अनसर्गिक संभोग देखील केलेला आहे. तसेच सदरची माहीती नमुद बालिकांनी संस्थेच्या अधिक्षक व काळजीवाहक गणेश पंडित याची पत्नी अरुणा गणेश पंडित आणि सचिव भिवाजी दीपचंद पाटील (रा. तळई ता. एरंडोल) यांना दिली.
घटनेचे गांभीर्य पाहता त्यांनी त्यांचे कर्तव्य न करता नराधम गणेश पंडित याला मदत करीत सदरची माहीती लपवुन ठेवली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनचे पीएसआय शरद बागल यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

