मुंबई राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी असून विधान परिषदेतील १२ राज्यपाल नामनियुक्त आमदारांचा तिढा सुटला आहे. सुप्रीम कोर्टाने या बारा आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठविल्यानंतर राज्य सरकारने या नियुक्त्या तातडीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महायुती सरकारने आमदारांच्या नियुक्तीबाबतचे सूत्र निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीने १२ सदस्यांची यादी राज्यपाल रमेश बैस यांना दिली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
यामध्ये भाजपच्या वाट्याला ६ जागा, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ३ जागा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा मिळणार असल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट सरकारमध्ये सहभागी होण्याआधी भाजप आणि शिंदे सरकार यांच्यात ८ आणि ४ असे सूत्र निश्चित झाले होते. मात्र अजित पवार यांच्या सहभागानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षांनी राज्यपाल नामनियुक्तीच्या समान म्हणजे प्रत्येकी ४ जागा घ्याव्यात, अशी चर्चा झाल्याची माहिती आहे.