विरार : विरारमध्ये काही दिवसांपुर्वी खाडीत दगड बांधलेला मृतदेह आढळला होता. या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. लग्नाचा तगादा लावत असल्याने प्रियकराने मित्राच्या मदतीने प्रेयसीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी प्रियकर हर्षद जाऊ पाटील (वय 26) आणि मित्र क्रितेश अशोक किणी (वय 28) यांना अटक केली.
रेश्मा प्रकाश खाडिये (वय 25) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून ती विरार पूर्व फुलपाडा येथील राहणारी आहे. हर्षद आणि रेश्मा या दोघांचे 2019 पासून प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून रेश्मा हिने हर्षदकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता. यातून त्यांचे नेहमी वादविवाद सुरु होते. लग्न तर करायचे नाहीच, पण प्रेयसीला आपल्या आयुष्यातून संपवायचे असा कट रचून प्रियकर हर्षद याने त्याचा मित्र क्रितेश याला सोबत घेऊन, 24 आणि 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्री रेश्मा हिला अज्ञातस्थळी बोलावले. खाडी किनारी भेटायला बोलावून त्याच ठिकाणी तिची गळा आवळून हत्या केली होती.
हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहाला 10 किलो वजनाचा दगड बांधला आणि तिचा मृतदेह बोटीतून नेऊन खाडीत फेकून ते फरार झाले होते. 27 नोव्हेंबर रोजी अर्नाळा म्हारंबल पाडा जेट्टी नं 22 परिसरात मृतदेहाला दगड बांधलेल्या कुजलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपी विरोधात हत्या करुन पुरावा नष्ट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने अर्नाळा पोलीस आणि गुन्हे कक्ष 03 अशा दोन स्वतंत्र टीमने तपास केला.