जळगाव प्रतिनिधी | २३ नोव्हेंबर रोजी एरंडोल येथील भूमिअभिलेख कार्यालयातील नियतानदार संजय नामदेव पाटील (वय ५२, रा. चाळीसगाव) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामाचा अतिरिक्त ताण दिल्याने विषप्राशन केले होते.मात्र, उपचार सुरू असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. विष घेण्यापूर्वी त्यांनी भूमिअभिलेख अधीक्षकांकडे आत्महत्येस परवानगी द्या असा अर्ज केला होता. त्यात त्यांनी कैफियत मांडली होती.
काय आहे प्रकरण?
मृत संजय पाटील यांचा मुलगा प्रशांत याने दिलेल्या माहितीनुसार, वडील हे एरंडोल येथील भूमापक कार्यालयात नियतानदार पदावर काम करत होते. सन २०१९ पासून वरिष्ठ त्यांच्यावर अतिरिक्त दबाव टाकत होते. रात्री घरी आल्यावरही कार्यालयीन काम करायचे. त्यांना कार्यालयात डाटा एन्ट्रीचे काम देणे अपेक्षित होते. परंतु, अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून मोजणीचे काम करून घेतले. या नंतर डाटा एन्ट्रीचाही लोड दिला. आता जानेवारी महिन्यात बदली होणार या अपेक्षेने ते त्रास सहन करीत होते. परंतु, त्रास असह्य झाल्याने त्यांनी २३ नोव्हेंबर रोजी कार्यालयातच विषप्राशन केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कार्यालयातील एकाही अधिकाऱ्याने पाटील यांची चौकशी, विचारपूस केली नाही. आता माझ्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चारही अधिकाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी प्रशांत व त्याचे मामा शांताराम पाटील यांनी केली आहे.
पाटील यांनी आत्महत्या करण्याची परवानगी मिळण्याचा अर्ज केला होता. त्या अर्जात म्हटल्याप्रमाणे आर. व्ही. जाधव, व्ही. एल. सोनवणे, व्ही. एल. पाटील, व ठाकूर या चार अधिकाऱ्यांनी त्यांना छळले होते. त्यामुळे चौघांवर कारवाईची मागणी कुटुंबियांनी केली आहे.
मृत पाटील यांच्या पश्चात मुलगा, पत्नी रजनी, मुलगा प्रशांत, मुलगी अश्विनी व प्रियंका असा परिवार आहे. हे कुटंुब चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथील रहिवासी आहेत. ते चाळीसगाव शहरात राहत होते.