जळगाव ;- महाराष्ट्राच्या काही भागातील पूरपरिस्थिती तसेच खान्देशात पुढील तीन दिवसात हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे 11 व 12 ऑगस्ट रोजी होणारे पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे.
रविवार पासून मूळजी जेठा महाविद्यालयात विद्यापीठाचे पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्र तसेच इतर काही जिल्हयांमध्ये संततधार पावसामुळे नद्या-नाल्यांना महापूर येऊन जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या जलप्रलयामुळे मोठी आपत्ती निर्माण झाली आहे. याशिवाय जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्हयात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडतो आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 8 ते 12 ऑगस्ट या कालावधीत या जिल्हयांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. एकूणच मानवतेच्या भावनेतून हे विद्यार्थी साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. संमेलनाच्या पुढील आयोजनाच्या तारखा यथावकाश कळविण्यात येतील अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे यांनी दिली.