जळगाव,(प्रतिनिधी): भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने मोठा अपघात होऊन दुचाकीवर पती व तीन वर्षीय मुलीसोबत प्रवास करणारी गर्भवती महिला जागीच ठार झाल्याची दृर्दैवी घटना रविवार, १२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ घडली.
अपघातात मृत्यू पावलेल्या गर्भवती महिलेचे नावं दीपाली योगेश कोळी (२२, रा. जुना असोदा रोड, जळगाव) असून ही महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. अपघातात सदर महिला जागीच ठार झाली. तर तिचे पती व तीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवार, १२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ घडली. मातृदिनीच गर्भवती महिलेवर काळाने झडप घातल्याने एकाच वेळी दोन जीव गेले, तर तीन वर्षीय मुलीचे मातृछत्र हरपले आहे.जुना असोदा रोड परिसरात योगेश गुलाब कोळी (२८) हे खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरीस आहेत.ते पत्नी दीपाली व तीन वर्षांची मुलगी काव्या हिला घेऊन निमगव्हाण येथे नातेवाइकांकडे भेटण्यासाठी गेले होते.
तेथून घरी परतत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्र. एमएच १९, सीएफ ९७९७) वराड गावाजवळ दुचाकीस्वार दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती योगेश व मुलगी काव्या हे दोघे गंभीर जखमी झाले.
अपघातात महिला जागीच ठार झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.










