पाचोरा (प्रतिनिधी) देशात कोविड -१९ कोरोना विषाणू या साथरोगाचा संसर्ग टाळण्यासाठी, त्याचा प्रसार थांबविण्यासाठी शासन व प्रशासनाकडून युध्द पातळीवर विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अशा या वैश्विक संकटाच्या काळात शासन व प्रशासनाला पुर्णपणे सहकार्य करणे अतिशय गरजेचे असल्याने पाचोरा येथील निर्मल सिडस् प्रा. लि. पाचोरा या कंपनीतील सर्व अधिकारी व कर्मचारी हे कोविड १९ कोरोना विषाणुच्या युध्दात शासन व प्रशासन यांना सहकार्य करण्यासाठी आर्थिक बळ घेऊन समोर आले आहेत.
या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यां यांनी आपण देशाचे काहीतरी देणे लागतो म्हणून “पी. एम. केअर” सहाय्यता निधीत मदतीसाठी केलेल्या आवाहानास विनम्रपणे प्रतिसाद देऊन स्वइच्छेने “पी. एम. केअर” सहाय्यता निधी – कोविड १९” साठी रुपये १५ लाख रुपयांची मदत केली असुन उपरोक्त रक्कम उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली “पी. एम. केअर” सहाय्यता निधी – कोविड १९” या खात्यात दि. १६ एप्रिल रोजी जमा करण्यात आली आहे.














