मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई व शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर मराठवाड्यात जोमानं कामाला लागणार असल्याचं सांगतानाच, जाधव यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. ‘चंद्रकांत खैरे हे आयुष्यात पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं.
हर्षवर्धन जाधव हे २००९ साली मनसेच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. मधल्या काळात अंतर्गत वादामुळं शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. तसंच, औरंगाबादमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला खरा, मात्र त्यांनी तीन लाखांच्या जवळपास मतं घेतली. त्यांच्या या मुसंडीमुळं शिवसेनेचे दिग्गज नेते खैरे यांचा पराभव झाला आणि एमआयएमचा उमेदवार निवडून आला. तेव्हापासून खैरे व जाधव यांच्यात वितुष्ट आलं आहे. दोघेही एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. जाधव यांनी आज मनसेत प्रवेश केल्यानंतर याचीच प्रचिती आली. खैरे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच जाधव यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. खैरे यांनी माझ्यावर व्यक्तिगत टीका करणं थांबवावं आणि त्यांनी खासदारकीची स्वप्नं आता सोडून द्यावी. ते आता पुन्हा कधीही खासदार होणार नाही, असंही जाधव यांनी ठणकावलं.














