मुंबई – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक आबिदअली नीमचवाला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कौटुंबिक कारणास्तव आबिदअली नीमचवाला यांनी राजीनामा दिला असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला कळवलं आहे. आबिदअली नीमचवाला यांनी राजीनामा दिल्याचे पडसाद विप्रोच्या शेअरवर उमटले. शुक्रवारी विप्रोचा शेअर दोन टक्क्यांनी घसरला. वाढती स्पर्धा आणि टार्गेट यांमुळे काॅर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची दगदग वाढली आहे. विशेषत: आयटी सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.
एप्रिल २०१५ मध्ये नीमचवला यांनी विप्रोमध्ये समूह अध्यक्ष आणि सीओओ म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याआधी ते ‘टीसीएस’मध्ये २३ वर्षे होते. फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांना बढती मिळाली आणि ते विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. ३१ जानेवारी २०२१ रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी कौटुंबिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिला. यामुळं विप्रोच्या संचालक मंडळाने नव्या ‘सीईओ’ची निवड प्रक्रिया सुरु केली आहे. ही नियुक्ती होईपर्यंत नीमचवाला यांच्याकडे तात्पुरता पदभार राहील, असे कंपनीने शेअर बाजाराला कळवलं आहे.