जळगाव –इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासह मुक्त वातावरणात परीक्षा होण्याच्या दृष्टीने व परीक्षेदरम्यान कॉपीला आळा बसावा यासाठी जिल्हाभरात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचा निर्धार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात 07 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचे आदेशावरून कॉपीमुक्त अभियानासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचे सह प्रशासनातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित मुख्याध्यापक यांना सूचना देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या सूचनांची काटेखोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले. दहावी व बारावीच्या परीक्षा भयमुक्त व आनंददायी वातावरणात होतील याची केंद्र संचालकांनी काळजी घ्यावी याबद्दल देखील सूचना देण्यात आल्या. परीक्षा दरम्यान 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद राहतील याबाबत काळजी घ्यावी. नियमांची उल्लंघन केल्यास संबंधित झेरॉक्स दुकानदारांना सह आरोपी करण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले. परीक्षा केंद्राच्या आतील जबाबदारी हे केंद्र संचालकांचे असेल तर बाहेर होणारे गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी पोलीस दलाची असेल याबाबत देखील सूचित करण्यात आले. परीक्षा दरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करावी, सर्व केंद्र संचालक विद्यार्थी व पर्यवेक्षक यांना ओळखपत्र सक्तीचे करावे परीक्षेदरम्यान नियमांची उल्लंघन करणे तसेच गैरप्रकार करणे या बाबी आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी सर्वांनी परीक्षा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडण्यास पोलीस दलाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी उपस्थित मुख्याध्यापक व केंद्र संचालकांना संबंधित करताना सर्व केंद्र संचालकांनी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेची गंभीरता लक्षात घेऊन या कामकाजात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. सर्व केंद्र संचालकांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी पूर्वतयारी करून परीक्षा केंद्राचा अहवाल सादर करावा भरारी पथक स्वतंत्रपणे कार्यान्वित करावे अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे आगामी परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पावले उचलले आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यासाठी दिलेल्या पत्राबाबत देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. यंदा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी 57487, व बारावीच्या परीक्षेसाठी 47667 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सदरील परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार असून दहावीसाठी 145 तर 12 वी करिता 81 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.