जळगाव,(प्रतिनिधी)- बखळ प्लॉट नावावर करून देतो असे सांगून जळगाव शहरातील मुक्ताईनगर येथील एका तरुणाची १८ लाखांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात चंद्रकांत तोष्णीवाल विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गौरव रवींद्र पवार (वय ४०, रा. कोजागिरी बंगलो, मुक्ताईनगर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान, त्याची चंद्रकांत सतीश तोष्णीवाल (रा. आदर्श नगर, जळगाव) याच्याशी १ नोव्हेंबर २०२३ रोजी ओळख झाली. त्यावेळी गौरव पवार यांना बखळ प्लॉट तुमच्या नावावर करून देतो, असे सांगून चंद्रकांत तोष्णीवाल याने गौरव पवार याच्याकडून वेळोवेळी एकूण १८ लाख रुपये घेतले. मात्र, हे पैसे घेतल्यावर देखील चंद्रकांत तोष्णीवाल यांनी हा प्लॉट गौरवच्या नावावर केला नाही. अनेक महिने होऊनही हा प्लॉट
आपल्या नावावर न झाल्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गौरवने पैसे परत करण्याची मागणी केली. त्यावेळी चंद्रकांत तोष्णीवाल यांनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे गौरव पवार याने रामानंदनगर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.