जळगाव,(प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या या भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणारं अशा चर्चा सुरु होत्या अखेर प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून उद्या दिनांक २४ रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीष महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी खासदार डॉ. उल्हास पाटील,पत्नी डॉ. वर्षा पाटील व त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील हे प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान भाजपा प्रवेशापूर्वीच काँग्रेसकडून डॉ उल्हास पाटील यांना निलंबित करण्यात आलेल्या या कारवाईमुळे जळगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
डॉ. केतकी पाटील मोदींच्या कार्याने प्रभावित…
कन्या डॉ. केतकी पाटील ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावित झाली असून मोदींनी जगात देशाचा नावलौकिक केला आहे,त्यांची कार्यपद्धती बघून तिने भारतीय जनता पार्टी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. तो तिचा अधिकार आहे. आजपर्यंत ती कोणत्याच पक्षाची सदस्य नसल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितलं.
रावेर लोकसभेची उमेदवारी मिळणार?
आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असतांना जळगाव जिल्ह्यातील एक मोठा नेता भजपात प्रवेश करत असल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी प्रमुख दावेदार असलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आपल्या कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासह भाजपा पक्षात प्रवेश करत आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाकडून डॉ. केतकी पाटील या रावेर लोकसभा निवडणूक लढतील असं चित्र दिसत होतं त्या पार्श्वभूमीवर डॉ. केतकी पाटील यांनी रावेर लोकसभा मतदार संघात संपर्क देखील सुरु केला होता. दरम्यान भाजपा प्रवेश होतं असल्याने त्यांना आगामी रावेर लोकसभा उमेदवारीच्या बाबत काही शब्द दिला आहे का याबाबतही राजकीय चर्चा होतांना दिसत आहे. जर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी डॉ. उल्हास पाटील यांना किंवा त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांना उमेदवारी दिल्यास विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता नाकारता येतं नाही.
काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही
आता काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही दिसत असल्याचा आरोप डॉ. उल्हास पाटील यांनी केला असून याचमुळे काँग्रेस रसातळाला जात आहे असं उल्हास पाटील म्हणाले. कुठलीही विचारणा किंवा नोटीस न देता कारवाई केल्याबद्दल उल्हास पाटील यांनी नाराजी व्यक्त केली, यामुळे इतकं काम करून सुद्धा असं निलंबन झाल्याने मी व्यथित झाल्याचे म्हटले. कुठलाही विचार न करता थेट कारवाई केल्यामुळे आता त्यांना विचारायचं काय?”, असा प्रश्न उल्हास पाटील यांनी उपस्थित केला.
डॉ.उल्हास पाटील भाजपात प्रवेश करणार
यावेळी उल्हास पाटील यांना भाजपात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “कारवाई झाल्यामुळे आता दुसरा काहीतरी विचार करावा लागेल”, असं म्हणत पत्नी वर्षा पाटील यांनासोबत घेऊन कन्या केतकी पाटील सोबत बुधवारी मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेशाचे संकेत दिले. दरम्यान तिघांचाही उद्या भाजपा प्रवेश निश्चित झाला असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे.