लाहोर- पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यात विशेष न्यायालयानं आज मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. मुशर्रफ सध्या पाकिस्तानात नाहीत. त्यांच्यावर दुबईत उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच मुशर्रफ यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आरोग्याबाबत माहिती दिली होती. मी कोणत्या परिस्थितीत आहे हे चौकशी आयोगानं येऊन पाहावं, असं ते म्हणाले होते.
मुशर्रफ यांनी ३ नोव्हेंबर २००७ रोजी देशात आणीबाणी लादली होती. या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाकिस्तानमधील तत्कालीन मुस्लीम लीग नवाज सरकारनं ही कारवाई केली होती. २०१३ पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. डिसेंबर २०१३ मध्ये त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल झाला होता. त्यानंतर ३१ मार्च २०१४मध्ये मुशर्रफ यांना आरोपी घोषित करण्यात आलं आणि त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये विशेष न्यायालयात साक्षी नोंदवल्या गेल्या.















