दिल्ली- संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचे निलंबित आमदार कुलदीप सेंगरला कोर्टाने दोषी ठरवले आहे. शिक्षेवरील सुनावणी १९ डिसेंबर रोजी होणार आहे. दिल्लीतील तीस हजारी कोर्टात आज न्यायालयाने आपला निकाल सुनावला. आरोपपत्र उशिरा दाखल केल्याबद्दल कोर्टाने तपास करणाऱ्या सीबीआयला फटकारले. या प्रकरणातील सहआरोपी शशी सिंह यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.
सेंगरला कोर्टाने भादंवि ३७६, पॉक्सो कायद्यातील कलम ५ (सी) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. आज कोर्टाने एका प्रकरणावर निकाल सुनावला असून आणखी चार प्रकरणांवर निकाल येणे बाकी आहे. कोर्टाने दोषी आमदार सेंगरचे मोबाइल लोकेशनला महत्त्वाचा पुरावा मानला. पीडित युवतीला शशी सिंह दोषी आमदाराकडे घेऊन गेला होता.














