जळगाव,(प्रतिनिधी)- गेली सात वर्षे सातत्याने नफ्यात असलेला जळगाव जिल्हा दूध संघ यंदा तब्बल ६ कोटी ७२ लाख रुपयांच्या तोट्यात आहे. आतापर्यंत ‘अ’ वर्गात असलेला संघ यंदा ‘ब’ वर्गात आला. नवीन सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला.
पुढे बोलतांना खडसे म्हणाले की,आमची सत्ता असताना जळगाव जिल्हा दूध संघ ही नावाजलेली संस्था होती. अध्यक्षपदी मंदकिनी खडसे असताना हा संघ गेली सात वर्षे सातत्याने नफ्यात होता. मात्र, यंदा हा संघ तब्बल ६ कोटी ७२ लाख रुपयांच्या तोट्यात आहे.वार्षिक अहवालात कोणतीही तरतूद नसताना दोन कोटींचा भाव फरक द्यावा लागला आहे. सहकारी नियमानुसार १२ रुपयांप्रमाणे वाढ करावी लागली परंतु खासगी विक्री ६ रुपयांप्रमाणे झाली. त्यामुळे दुप्पट फरक द्यावा लागला आहे.