नाशिक – सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यास ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.आज दुपारी एक ते सव्वा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून जाधव यास ताब्यात घेतले.
अधिक माहिती अशी की, एका दाखल गुन्हातील पकडलेले वाहन सोडून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. हे वाहन सोडून देण्यासाठी तक्रारदाराकडे जाधव यांनी पोलीस चौकीचे बांधकाम करण्यासाठी २ लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यातील १ लाख २० हजार रुपये त्यांनी घेतले होते. त्यानंतर आज यातील उररीत रक्कम ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत माहिती दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार आज दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास रक्कम घेताना रंगेहात अटक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. लाचलुचपत विभागाकडून गुन्हा नोंदविण्याचे कार्य सुरु आहे.