झाबुआ : मध्य प्रदेशातील झाबुआमध्ये सामुहिक विवाह सोहळ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मुख्यमंत्री कन्यादान योजने अंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्या दरम्यान कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचं वाटप करण्यात आल्याच्या प्रकारामुळे मंडपात वऱ्हाडीमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, याबाबत प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
मध्यप्रदेशातील झाबुआ येथील थांदलाच्या दसरा मैदानावर 296 जोडपे विवाह बंधनात अडकले. त्यावेळी हा प्रकार घडला. विशेष म्हणजे या एवढ्या मोठ्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित राहू शकले नाहीत. पण त्यांनी ऑनलाईन संवाद साधत नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिला.
मध्यप्रदेशात अनेक सामूदायिक विवाह सोहळे झाले. पण पहिल्यांदाच एखाद्या सामूहिक विवाह सोहळ्यात मेकअप किटमधून कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मेकअप किट्समध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळया कुणी ठेवल्या याची थांगपत्ता लागलेला नाही. कुणीही याची जबाबदारी घेतलेली नाही. सर्वांनीच हातवर केले. काही अधिकाऱ्यांना याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी हा कारनामा आरोग्य विभागाने केल्याचं सांगितलं. पण आरोग्य विभागाने त्यावर अजून भाष्य केलेलं नाही.