नाशिक : अनेकदा महावितरणच्या माध्यमातून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल आल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. आता पुन्हा अशीच एक घटना समोर आलीय. हा कुणी कारखानदार किंवा हॉटेल व्यावसायिक नाही तर बांगडी विक्रेता आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील बांगडी विक्रेत्याला महिन्याचं बिल तब्बल लाखोंच्या घरात पाठविले आहे. बिल पाहिल्यानंतर बांगडी विक्रेत्याने देखील डोक्यावर हात मारुन घेतला आहे.
मनमाड शहरातील सरदार पटेल रोडवर राहणारे इक्बाल शेख यांची शिवाजी चौकात बांगड्या विकण्याची छोटीशी टपरी असून त्यावर कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालतो. घरात तीन लाईट आणि एक पंखा आहे. असे असताना देखील महावितरणने त्यांना एक महिन्याचे तब्बल 4 लाख 5 हजार 490 रुपयांचे बिल पाठवले आहे.
एवढ्या मोठ्या रकमेचे बिल पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी महावितरणच्या कार्यालयात धाव घेऊन दर महिन्याला बील भरलेले असताना, माझी कोणतीही थकबाकी नसताना मला लाखो रुपयांचे बील का देण्यात आले अशी तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी चार लाखातून बिल कमी करुन त्यांना 2 लाख 13 हजार 360 रुपयाचे बिल देऊन तातडीने भरण्यास सांगितले.