मुंबई : महाराष्टासह देशातील अनेक भागात तापमानाच्या वाढीने नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. दिवसेंदिवस उकाडा वाढत असून दिलासा मिळत नाही. अशातच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना हवामान विभागाने एक दिलासादायक बातमी दिली आहे. यानुसार, पुढील पाच दिवसांमध्ये देशातील काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, दुसरीकडे पुढील 2 दिवस महाराष्ट्रासह देशात तापमानाचा पारा आणखीच वाढणार असल्याचा अंदाज आहे.
देशातील हवामानात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यातच पुढचे दोन दिवस कडक ऊन आणि उकाडा याचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. तर, मंगळवारी देशभरातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
हवामान खात्याने (IMD) येत्या काही दिवसांत भारताच्या बहुतांश भागात हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागराच्या काही भागात नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकल्याने पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने 23 ते 25 मे दरम्यान पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळू शकते. 22 आणि 23 मे रोजी विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील पाच दिवसांत आर्द्र हवा आणि उच्च तापमानामुळे कोकण भागात तसेच केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातही उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे.