जळगाव : जळगाव तालुक्यातील धानवड गावाजवळील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आलीय. करन जयराम पवार (वय-११) रा. चिंचोली ता. जि. जळगाव असे मयत बालकाचे नाव असून या घटनेने चिंचोली गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे घटना?
जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात करन पवार हा वास्तव्याला होता. त्याचे वडील जयराम सुकराम पवार हे ट्रॅक्टर चालक आहे तर आई सुनिता शेतात जावून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी सकाळी आई व वडील हे शेतात कामासाठी निघून गेले. त्यावेळी चारही भावंडे घरीच होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास करण हा गावातील मित्रांसोबत जवळ असलेल्या धानवड गावानजीकच्या धरणात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही बाब सोबत असलेल्या तीन मित्रांना समजल्यानंतर त्यांनी आरडाओरड करत गावाकडे धाव घेतली.
माहिती मिळाल्यावर गावातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काही पट्टीच्या पोहणाऱ्या तरूणांनी पाण्यात उडी घेवून करनचा मृतदेह बाहेर काढला व खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. एमआयडीसी पोलिसांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेवून पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयात करनच्या आई-वडिलांनी मोठा आक्रोश केला. अकरा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चिंचोली गावात हळहळ व्यक्त होत आहे.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रतिलाल पवार हे करीत आहेत.