मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते आता मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर राहण्यासाठी जातील. त्यामुळं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा बंगला आता रिकामा करावा लागणार आहे. त्यासाठी फडणवीसांची लगबग सुरू झाली असून, घरातील वस्तू शिफ्ट करणाऱ्या कंपन्यांची वाहनं ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ते मुंबईत नवीन घराचा शोध घेत असल्याचं समजतं.
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘वर्षा’ बंगला रिकामा करण्यास गुरुवारपासूनच सुरूवात केली आहे. घरातील वस्तू शिफ्ट करणारी वाहनं मलबार हिल येथील निवासस्थानी पोहोचली आहेत, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, फडणवीस हे मुंबईत नव्या घराचा शोध घेत आहेत. सध्या तरी मुंबईत राहण्याचा विचार फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. फडणवीस यांच्या पत्नी अमृता या अॅक्सिस बँकेत उच्चपदावर काम करत आहेत. तसंच त्यांची मुलगीही मुंबईतील शाळेत शिक्षण घेत आहे. ऑक्टोबर २०१४मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस नागपूरहून मुंबईत वास्तव्यास आले होते. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड झाली असून, नव्या विधानसभेत त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.
राज्यात कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता न आल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्याचवेळी अजित पवार यांच्या मदतीनं देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या सरकारला शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. यावर सुप्रीम कोर्टानं फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. मात्र, त्याआधीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अखेर बहुमताअभावी देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. फडणवीस सरकार अवघ्या साडेतीन दिवसांत कोसळलं होतं.