भोपाळ – मध्यप्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळामध्ये (व्यापमं) झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने सर्वच्या सर्व ३१ आरोपींना दोषी ठरवले आहे. याबाबत येत्या २५ नोव्हेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार असून कोर्टा या आरोपींना कोणती शिक्षा सुनावणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
व्यापमं घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सर्व ३१ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. हे सर्व आरोपी जामिनावर होते. मात्र कोर्टाने आज त्यांना दोषी ठरवल्याने या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. व्यापमंकडून झालेल्या प्री-मेडिकल टेस्टमधील गडबडीप्रकरणी अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. पण जुलै २०१३ मध्ये इंदूर क्राइम ब्रँचने डॉ. जगदीश सगर यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. या घोटाळ्याप्रकरणी सगर यांना मुंबईच्या एका आलिशान हॉटेलातून अटक करण्यात आली होती. त्यांच्या इंदूरच्या घरातून कोट्यवधींची कॅशही जप्त करण्यात आली होती. पोलिसांच्या मते, सगर यांनी ३ वर्षाच्या कार्यकाळात १०० ते १५० विद्यार्थ्यांना चुकीच्या मार्गाने प्रवेश दिला होता, हे त्यांनी मान्यही केले होते.















