ग्वाल्हेर : मध्यप्रदेशमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. महिलेने चार पाय असलेल्या मुलीला जन्म दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही बातमी सोशल मीडियावर पसरताच या अनोख्या मुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात लोकांची गर्दी होऊ लागली. डॉक्टरांनी नवजात बालकाला न्यू बॉर्न केअर युनिटमध्ये ठेवले आहे.
ग्वालियअर येथील सिकंदर कंपू येथे राहणारी आरती कुशवाह हिने या मुलीला जन्म दिला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक शारिरीक व्यंग आहे. वैज्ञानिक भाषेत याला इशियोपेगस असं म्हणतात. यामध्ये गर्भात वाढणाऱ्या अर्भकाच्या शरीराच्या खालच्या भागाचा अतिरिक्त विकास होत जातो. एक लाखातून एकाला असा आजार होतो. शस्त्रक्रिया करुन ही आपण शरिराचा अतिरिक्त भाग काढून टाकू शकतो, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
चिमुकलीचे दोन पाय शस्त्रक्रिया करुन काढून टाकण्यात येणार आहे. मात्र, सध्या या मुलीच्या सर्व चाचण्या करण्यात येत असून ती पूर्णपणे सुदृढ आहे, असं रुग्णालयातून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, चार पायांच्या मुलीला पाहण्यासाठी लोकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. सोशल मीडियावरही फोटो व्हायरल होत आहेत. रुग्णालयातील दुसऱ्या रुग्णांचे कुटुंबीयही या मुलीला पाहण्यासाठी वॉर्डमध्ये आले आहेत. तर काही नागरिक या मुलीला चमत्कारी बोलत आहे तर काही जण तिला दैवी अवतार मानत आहे. मात्र, ही एक वैज्ञानिक घटना आहे.