जळगाव : जळगावमध्ये गुन्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील मेहरूण येथे राहणाऱ्या प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय-३३) या तरूणाचा धारदार हत्यार आणि दगडाने वार करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक घटना सोमवारी समोर आली. भाड्याने घरात राहणाऱ्या विवाहितेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत जळगाव पोलीस अधिक तपास करत असून दोघा जणांना या तरुणाच्या हत्येप्रकरणी अटकही करण्यात आली आहे.
मेहरूण परिसरातील जय भवानी नगरात राहणारे प्रमोद सुरेश शेटे वय-३३ हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कामाला आहेत. दररोज ते दुचाकीने ये-जा करतात. दि.१० रोजी सकाळी ७ वाजता ते कामावर गेले मात्र दुपारी ५ वाजेपर्यंत घरी परतलेच नाही. कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
प्रमोद शेटे यांच्या मालकाला फोन केला असता ते ४ वाजताच कामावरून निघाले असल्याची माहिती समोर आली. तसेच मानराज पार्क येथे त्यांना काही नागरिकांनी देखील पाहिले होते. दोन दिवस होऊन देखील मुलगा घरी न आल्याने सुरेश हरी शेट्टी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
याच दरम्यान पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याचा मृतदेह सोमवारी गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदीराजवळ आढळून आला. एमआयडीसी पोलिसांनी खून करणाऱ्या संशयिताबद्दल माहिती काढली असता आरोपी जंगलात लपून बसल्याचं समोर आलं. दोघेही आरोपी जळगाव तालुक्यातील उमाळा येथील जंगलात लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खून करणाऱ्या सत्यराज नितीन गायकवाड, वय 26 रा. गणेश नगर, जळगाव, सुनिल लियामतखाँ तडवी, वय 26 , रा. पंचशील नगर, फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव या दोघांना अटक केली.
पुढील कारवाईसाठी दोघांना जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कट रचून दोघांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आता नितीन आणि सुनिल या दोघांचीही कसून चौकशी केली जातेय. हत्येच्या या घटनेनं जळगाव शहरात खळबळ माजलीय.