नागपूर : एका अनोळखी व्यक्तीने वाटलेली चॉकलेट्स खाल्ल्यामुळे नागपूरच्या एका शाळेतील तब्बल 18 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलांना उलट्या व मळमळल्यासारखे वाटत होते. विद्यार्थ्यांना सीताबर्डी येथील लता मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, एक काळ्या रंगाची कार शाळेबाहेर येऊन थांबली. या कारमधून तोंडावर मंकी कॅप घातलेली एक व्यक्ती उतरली. या व्यक्तीने शाळेबाहेरच्या आवारात जमलेल्या मुलांना चॉकलेट्स वाटली आणि संबंधित व्यक्ती तिथून निघून गेला. ही चॉकलेट्स मुलांनी खाल्ली. एक-दोन चॉकलेट्स खाल्लेल्या मुलांना फारसा त्रास जाणवला नाही. मात्र, अनोळखी व्यक्तीकडून चार ते पाच चॉकलेट्स घेऊन खाल्लेल्या मुलांना त्रास जाणवायला लागला. ही बाब शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर 18 मुलांना नजीकच्या लता मंगेशकर रुग्णालयात तातडीने दाखल केले.
पोलिसांकडून तपास सुरु
या मुलांना शाळेच्या बाहेर एका अनोळखी व्यक्तीने चॉकलेट वाटल्याचे समोर आले आहे. चॉकलेट वाटणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, याचा शोध सुरू असल्याची माहिती बर्डी पोलिसांनी दिली आहे. कोणी वाढदिवशी चॉकलेट वाटले की काही वेगळा हेतू होता या सर्व बाबी तपासानंतर उघड होईल असे पोलिसांनी सांगितले.
मुलांची प्रकृती धोक्याबाहेर
या सर्व मुलांना सिताबर्डी येथीलच एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर ताबडतोब प्रथमोपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे. अशा प्रकारे चॉकलेट देऊन लहान मुलांना भलतंच काहीतरी खायला दिल्याने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. कुणीही काही खायला दिलं तरी खाऊ नये, असं पालकांनी मुलांवर बिंबवणं गरजेचं आहे.