मुंबई: राज्यातील सत्तापेच आणि राष्ट्रपती राजवटीच्या पार्श्वभूमीवर येत्या शुक्रवारी शिवसेना आमदारांची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राज्यातील सत्तापेचावर चर्चा होणार असल्याने या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राज्यातील सत्तापेच न सुटल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही काँग्रेससोबत जाण्यासाठी शिवसेनेने केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामाही दिला आहे. शिवाय एनडीएतूनही शिवसेनाबाहेर पडली आहे. त्यामुळे शिवसेनेला संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी बाकांवर स्थान देण्यात आलं आहे. त्याशिवाय तिन्ही पक्षांनी मिळून किमान समान कार्यक्रमाचा मसुदाही तयार केला आहे. मात्र शिवसेनेसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्यापही थेट भाष्य केलेलं नाही. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून अद्यापही संभ्रम निर्माण झालेला आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात? आमदारांना काय सूचना देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.