जळगाव: पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यातील वाद हे कुणापासून लपून राहिलेले नाहीत. महाविकास आघाडी सरकारमध्ये असतांनाही दोन्ही नेत्यांनी याबाबत जाहीरपणे भाष्य केले होते. नंतर शिंदे सरकारमध्ये दोन्ही नेत्यांमधील वाद अजून कायम असल्याचे दिसून येत आहे. आता अशातच आ. चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटलांना खडेबोल सुनावले आहे.
नेमका काय आहे प्रकार?
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीला विकासकामे दिली. चिमणराव पाटील यांना न विचारता ही कामे दिली. तसेच या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याला स्वत: गुलाबराव पाटील आणि त्यांचे चिरंजीव उपस्थित होते. या कार्यक्रमातून चिमणराव पाटील यांना वगळण्यात आले. त्यामुळे चिमणराव पाटील कमालीचे संतप्त असून त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गुलाबराव पाटील यांची तक्रार केली आहे.
मला विश्वासात न घेता मतदारसंघातील कामे राष्ट्रवादीला दिली हे चुकीचंच आहे. त्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकार शंभर टक्के बंद करतील आणि कदाचित पुढे हे बंद होईल, असं चिमणराव पाटील म्हणाले.
माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादीला पाठबळ देण्याचा त्यांचा महान हेतू कशासाठी आहे त्यांनाच विचारा. माझ्यापेक्षा जनता जास्त बोलते. जनतेला जास्त कळतं, असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाची मला अपेक्षाही नाही. फक्त निमंत्रण मिळाल्यावर आमच्या पक्षाच्या लोकांनी त्यांच्या कार्यक्रमाला जाऊ नये एवढी अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.