मुंबई : ठाण्यातील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) च्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. काही अज्ञात हल्लेखोरांनी कार्यालयाची तोडफोड करून एकावर तलवार, चाकू आणि रॉडच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. याबाबत ठाणे पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्यातील मुंब्रा परिसरात असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम (MIM) पक्षाचे कार्यालय आहे. येथे काही अज्ञात गुंडांनी घुसून तलवार, चाकू आणि रॉडच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. अज्ञातांकडून हा हल्ला एमआयएमचे कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष सैफ पठाण यांना दुखापत करण्यासाठी करण्यात आला होता. मात्र सैफ पठाण हे काही कामानिमित्त बाहेर गेले असल्याने आरोपींनी एमआयएम कार्यालयात हल्ला करून तेथे उपस्थित असलेल्या सैफ यांच्या दोन मित्रांना जखमी केले आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नसून कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
ठाण्यातील मुंब्रा परिसरात कार्यालयात घुसून MIM कार्यकर्त्यांवर तलवार आणि चाकूने जीवघेणा हल्ला pic.twitter.com/TIWqlG2kXU
— Maharashtra Times (@mataonline) September 23, 2022
फेब्रुवारीमध्ये ओवेसींच्या ताफ्यावर हल्ला झाला होता
या वर्षी फेब्रुवारीमध्ये असदुद्दीन ओवेसी स्वतः हल्ल्याचा बळी ठरले आणि थोडक्यात बचावले. वास्तविक, हापूरच्या छिजारसी टोलनाक्यावर ओवेसींच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. ३ फेब्रुवारीच्या घटनेत ओवेसींच्या ताफ्यावर गोळीबार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी सचिन शर्मा आणि शुभम नावाच्या आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आणखी एका आरोपीला पोलिसांनी पकडले. मुख्य आरोपी सचिन शर्माकडून एक 9 एमएम पिस्तूल आणि तीन गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी शुभमकडून 32 बोअरचे रिव्हॉल्व्हर आणि एक किऑस्क सापडले. आरोपी सचिनने पोलीस चौकशीत खुलासा केला होता की, त्याने तीन-चार वेळा ओवेसींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही.