मालेगाव : मालेगावात स्टंटबाजी करणं एका युवकाच्या अंगाशी आलं आहे. पूर आलेल्या गिरणा नदीत उडी घेतलेला तरुण बेपत्ता झाला आहे. नईम अमीन असे या तरुणीचे नाव असून तरूणाचा हा स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, या तरुणाचा शोध सुरू झाला असून अद्यापही तो सापडलेला नाही.
मागील आठवडाभरापासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू (Heavy Rain) आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधील नद्या, नाले याठिकाणी जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या कळवण, बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने तिथल्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने गिरणा नदीला मोठा पूर आला आहे. मालेगावमधून वाहणाऱ्या गिरणा नदीवर केटीवेअर बंधारा बांधण्यात आला असून पुरामुळे त्यावरुन पाणी वाहत आहे. याच पुराच्या पाण्यात गिरणा नदीच्या पुलावरुन एका तरुणाने उडी मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
मालेगाव, नाशिक : स्टंटबाजी करत तरुणाने गिरणा पुलावरुन नदीत मारली उडी; बेपत्ता तरुणाचा शोध सुरु…#Nashik #Malegaon #HeavyRain #Stunt #ViralVideo
Video Credit: Abhijeet Sonawane pic.twitter.com/zB3HgUIQEW
— Akshay Baisane | अक्षय बैसाणे (@Baisaneakshay) July 14, 2022
उडी मारल्यानंतर हा तरुण बेपत्ता झाला असून त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. याच केटीवेअर बंधाऱ्यावर यापूर्वीही अनेकदा तरुणांकडून हुल्लडबाजी आणि स्टंटबाजीच्या घटना घडल्यात. त्यामुळे पूर परिस्थितीत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.