मुंबई,(प्रतिनिधी)- अधिवेशन आटोपल्या नंतर एका पत्रकार परिषदेत पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडून माइक समोरून उचलून घेतल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये दिसत असून या घटनेवरून पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.याबाबत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फडणवीसांना लक्ष करीत टीका केली आहे.काल तर माइक हिसकावला, उद्या आणखी काय हिसकावतील, असा खोचक टोला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.
नेमका काय आहे प्रकार….
काल विधिमंडळाचे अधिवेशन संपल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली दरम्यान एका पत्रकाराने गुगली टाकत एकनाथ शिंदेंना संतोष बांगर हे कोणत्या पक्षातून तुमच्या पक्षात आले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाने एकनाथ शिंदे थोडेसे गोंधळले. काय उत्तर द्यावं हे त्यांना कळेना, कुठल्या पक्षामधून काय, ते शिवसेनेतून आलेत ना, असं ते म्हणाले. तेवढ्यात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोरून माईक खेचला आणि सूत्रे आपपल्या हाती घेतली. संतोष बांगर हे शिवसेनेतून खऱ्या शिवसेनेतून आले, आतापर्यंत ते चुकीच्या गटात होते, असं हजरजबाबी उत्तर फडणवीसांनी देत सारवा सारव केली पण या प्रकारानंतर खुद्द शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली.
देवेंद्र फडणवीसांनी दिलं सडेतोड उत्तर…
घडलेल्या माईक प्रकरणावर उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिलं असून एकनाथ शिंदे आणि आमची काळजी तुम्ही करू नका. आम्ही एकमेकांच्या गोष्टी हिसकावणार नाहीत तर परस्परांना गोष्टी देणार आहोत. पुढील अडीच वर्ष हे सरकार उत्तम चालेल आणि त्यानंतरही आम्ही बहुमताने निवडून येऊ, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.