मुंबई : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्यात आता सात हजार पदांची पोलीस भरती होणार आहे. पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरती प्रक्रिया होणार असून यासाठी गृह खात्याची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
ही भरती प्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे. लवकरच भरतीची जहिरात काढली जाईल. भरती प्रक्रिया राबवण्यासाठी गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 7 हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्ष राज्यात पोलीस भरती झाली नाही. त्यामुळे हजारो तरूणांचे डोळे भरतीकडे लागले आहेत. आता महाविकास आघाडी सरकारने ७ हजार पदांसाठी पोलसी भरती प्रकिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील तरूणांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भरती प्रक्रियेनंतर आणखी एक जम्बो पोलीस भरती होण्याचीही शक्यता आहे.
एक ते दीड महिन्यात पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. याआधी पाच हजार पदांची भरती झाली होती. त्यानंतर आता हा सात हजार पदांचा दुसरा टप्पा असेल. तर त्यांनंतर तिसरा टप्प्यात दहा हजारांपेक्षा जास्त जागांसाठी भरती होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.