जळगावः जळगावमध्ये आक्षेपार्ह व्हॉटस्अॅप स्टेटसवरून दोन गटांत वाद निर्माण झाल्यामुळे मध्यरात्रीनंतर समाजकंटकांच्या दोन गटांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत दोन वाहनांच्या काचा फुटल्या असून, एक तरुण जखमी झाला आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. सध्याही जळगावमध्ये शांतता आहे. मात्र, सोशल मीडियावरील एखादा मेसेजही नाहक शहरास वेठीस धरून सामाजिक वातावरण गढूळ करतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
जळगावमध्ये एका तरुणाने आक्षेपार्ह व्हॉटसअॅप स्टेटस ठेवले होते. या तरुणाला मराठी शाळेच्या मोकळ्या मैदानात नेत काही तरुणांनी मारहाण केली. काही जणांनी मध्यस्थी करून ही मारहाण सोडवली. मात्र, त्यानंतर शहरात अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे मलिकनगर आणि नसीमन कॉलनीमध्ये काही समजाकंटकांनी दगडफेक केली.
दगडफेकीमध्ये रहीस युसूफ मणियार यांच्या मालकीची आयशर ट्रक व डॉ. सुफियान शाहा यांच्या मालकीची फोरव्हिलर सेंट्रो कारच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर अहमद अखिल पिंजारी हे रस्त्याने मलिक नगरमध्ये जात असताना डोक्याला दगड लागल्याने जखमी झाले. एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.














