जळगाव : खासदार उन्मेष पाटील विरुद्ध पालकमंत्री गुलाबराब पाटील यांच्यातील शाब्दिक युद्ध पुन्हा एकदा सुरु झाले आहे. दोन दिवसापूर्वी जळगावात शेतकऱ्यांच्या वीज समस्येसह विविध मागण्यांबाबत भाजपच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावरून गुलाबराव पाटील यांनी खा. उन्मेष पाटलांवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपने मोर्चा काढला, त्यात त्या खासदाराने इथे बोंबलण्यापेक्षा दिल्लीत जर बोंबलले असते तर त्यांचा जाहीर सत्कार झाला असता, अशी टीका ना. पाटील यांनी केली आहे.
आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव रेल्वेस्थानक बाहेर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ना.गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारनियमनावर बोलताना ना.गुलाबराव पाटील म्हणाले कि, भारनियमन होते आहे.. त्यामुळे शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अनेकांना त्याचा मोठा फटका बसतो आहे. कोळसा केंद्राकडून मिळत नसल्याने हि परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्राने आपल्याला कोळसा द्यावा. केंद्रात बसलेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांनी मोदी साहेबांना कोळसाबाबत आठवण करून द्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
तसेच यावेळी खा उन्मेष पाटलांवर टीकास्त्र सोडले. जखम डोक्याला आणि मलम मांडीला अशी बोलण्याची त्यांची तत्परता चुकीची आहे. माझ्यावर टीका केल्याशिवाय खासदार मोठे होऊच शकत नाही. अरे हा पट्ठ्या राहिला नसता तर तू निवडूनच आला नसता अशी टीका पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केली.














