बीड : माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमानुष छळानंतर सासरकडील मंडळींनी विवाहित तरुणीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं फेकल्याची धक्कादायक घटना बीडमधील शाहूनगर परिसरात घडलीय. यास्मिन शकूर शेख असं हत्या झालेल्या 21 वर्षीय विवाहित तरुणीचं नाव असून या प्रकरणी पतीसह दीर आणि जाऊ विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी पतीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय आरोपी शकूर शेख याचं पाच महिन्यांपूर्वी 26 ऑक्टोबर 2021 रोजी बीड जिल्ह्यातील इस्लामपुरा येथील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय यास्मिनशी झाला होता. आरोपी शकूर हा मिस्त्री काम करतो. लग्नानंतर काही दिवस त्याने यास्मिनला चांगलं सांभाळलं. पण त्यानंतर सासरच्यांनी तिचा छळ करायला सुरुवात केली. सतत होणाऱ्या छळाला यास्मिन कंटाळली होती. ‘मला येथून घेऊन जा’ असं ती आपल्या वडिलांना म्हणत असे.
22 मार्च रोजी देखील तिने वडिलांना फोन करून येथून घेऊन जा, अशी विनवणी केली होती. पण वडिलांनी तिची समजूत घालून तिथेच राहण्यास सांगितलं होतं. पण त्यानंतर गुरुवारी अचानक सकाळी शकूर यानं आपल्या सासऱ्यांना फोन करून यास्मिन इमारतीवरून कोसळली असल्याचं सांगितलं. विवाहितेच्या खुनानंतर तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी केली होती. या प्रकरणी मृत यास्मिनचे वडील रहिम शरिफोद्दीन शेख (इस्लामपुरा, बीड) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी संशयित आरोपी पती शकूर बशीर शेख (29) याला अटक केली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात
आहे.
















