जळगाव – महिला पोलीस कर्मचार्याच्या पित्याचा चौघांनी केलेल्या मारहाणीत उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. वासुदेव त्र्यंबक डांगे (वय 52 रा. हनुमान नगर, अयोध्यानगरजवळ) असे मयताचे नाव आहे. घटनेची दखल घेत जिल्हापेठ पोलीसांनी तपासचक्रे फिरवून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
पोलीस मुख्यालयातील आरसीपी प्लॉटून नंबर-8 मध्ये रुपाली वासुदेव डांगे कार्यरत आहे. त्यांचे वडील वासुदेव डांगे यांचे न्यू. बी.जे. मार्केटसमोरील अप्पा महाराज समाधीजवळील राठी भवन येथे साई इलेक्ट्रीक नावाने मशिन दुरुस्तीचे दुकान आहे. सायंकाळी वासुदेव डांगे हे दुकानावरून काही कामासाठी बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या परिचीत असलेल्या एका व्यक्तीने त्यांना फोन करून दुकानावर बोलविले. सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास वासुदेव डांगे दुकानावर आल्यावर राजु न्हावी, निलेश बाविस्कर, गोल्यावाला (पूर्ण नाव माहिती नाही) व अन्य एकाने त्यांना बेदम मारहाण केली. रक्तबंबाळ अवस्थेत वासुदेव डांगे हे जिल्हापेठ पोलीसात तक्रार देण्यासाठी गेले. यावेळी पोलीसांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठीचा मेमो देवून जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यास सांगितले.













