धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील रहिवासी सैन्य दलातील जवानाने त्याच्याच गावातील २४ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध ठेवले. लग्नाचे आमिष दाखवून तिला भुसावळात आणून अत्याचार केल्याची घटना फेब्रुवारी २०२२ रोजी घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल होऊन तो तपासासाठी भुसावळ बाजारपेठ पोलिसांत वर्ग झाला. आकाश संजय काळे (रा. धरणगाव तालुका) असे संशयिताचे नाव आहे. तो हल्ली जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर आहे.
धरणगाव तालुक्यातील २४ वर्षीय तरुणी उच्च शिक्षित असून २६ फेब्रुवारीला तिने जळगावात महाराष्ट्र लाेकसेवा अायाेगाची परीक्षा दिली. परीक्षेच्या एक दिवस अगाेदर २५ रोजी संशयित आकाशने तिला कॉल केला. २६चा पेपर झाल्यानंतर भुसावळात भेटण्याचे सांगितले. यानुसार दोघे रेल्वेने भुसावळात आले. तेथे आकाशने तरुणीला घड्याळ व चांदीची अंगठी भेट दिली. लग्नासाठी जम्मूहून मंगळसूत्र आणल्याचे सांगत ते हॉटेल गॅलेक्सीमध्ये ठेवल्याची बतावणी केली.
नंतर रात्री १० वाजेच्या सुमारास तरुणीला हॉटेलमध्ये आणून विश्वास संपादन करून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी २८ फेब्रुवारीला आकाशने पीडितेला फोन करून ५ मार्चला माझा विवाह आहे. त्यामुळे पुन्हा कॉल करू नये, असे बजावले. तरुणीसोबत लग्नाला नकार दिला. यामुळे तिने धरणगाव पोलिसांत आकाश विरूद्ध लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.