जामनेर /जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील कांग नदीच्या पुलाखाली आढळलेल्या संशयास्पद खूनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. जामनेर पोलिस स्टेशनला दाखल अकस्मात मृत्यूच्या तपासात ‘या’ खूनाची उकल करण्यात मोठं यश मिळालं आहे, धक्कादायक बाब म्हणजे खून करणारा संशयित आरोपी हा जवळचाच नातेवाईक आहे.
सविस्तर असे की,पवन अशोक माळी (बोदवड जि.जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुभम माळी असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. आरोपी पवन माळी यास बोदवड तालुक्यातील नाडगाव येथून अटक करण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी जामनेर बोदवड रस्त्यावरील कांग नदीच्या पुलाखाली एक इसम मृतावस्थेत मोटार सायकलसह आढळून आला होता. याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली होती.
सकृतदर्शनी हा खूनाचा संशयास्पद प्रकार वाटत असल्यामुळे पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किरणकुमार बकाले यांना समांतर सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. मयत व टॅंकरवर चालक असलेला मयताचा मामेभाऊ पवन माळी यांच्यात पैशांच्या देवाण घेवाणीतून वाद झाला होता अशी माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना समजली होती.
घटनास्थळावरील फुटेजमधे मयत शुभम माळी व आरोपी पवन माळी सोबत दिसून आले होते. पवन यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. मयत शुभम नंदु माळी यास पैश्याच्या कारणावरुन मारहाण करुन त्याची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याच्याविरुद्ध जामनेर पो.स्टे.ला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे करीत आहेत. या तपासकामी पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, सफो अशोक महाजन, पोलिस हवालदार सुनिल दामोदरे, लक्ष्मण पाटील, पो ना किशोर राठोड, पो ना रणजीत जाधव, पो ना श्रीकृष्ण देशमुख, पो कॉ विनोद पाटील, चालक पो ना मुरलीधर बारी, संदिप सावळे, ईश्वर पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.