जालना : सध्या ऊस तोडणी चालू असून कारखान्याकडे उसाच्या ट्रॉल्या जात आहेत. या ट्रॉलीमध्ये भरलेले ऊस पाहून मुलांना ऊस तोडण्याचा मोह आवरला जात नाही, पण हा मोह एका १३ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला आहे. चालत्या उसाच्या ट्रॉलीवर चढून ऊस तोडण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला आहे. अरबाज रशीद शेख (वय 13) असं मयत झालेल्या मुलाचं नाव असून हसनाबाद भोकरदन रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर ही घटना घडली.
रस्त्याने जाणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक MH- 21/BQ 2487 च्या 2 ट्रोल्या ऊस भरुन भोकरदनकडे चालल्या होत्या. हसनाबाद येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालया समोर हा ट्रॅक्टर आल्यावर अरबाज रशीद शेख हा ऊस तोडण्यासाठी ट्रॉलीवर चढला. तेवढ्यात त्याचा तोल गेल्याने तो खाली पडून चाकाखाली आला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत अरबाजला प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्याचा काल सायंकाळी हसनाबड येथे दफनविधी करण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.