एखाद्या नवीन विचाराला समाजमनांत पूर्णतः रुजविण्यासाठी आपलं आयुष्य झोकून देणं , हे खरे तर कुठल्याही यज्ञासारखेच ! शाहू- फुले -आंबेडकरांनी जशी शिक्षण आणि समाजक्रांती घडवून आणली तद्वतच शाकाहार सदाचाराची नवी संस्कृती समाजात रुजवायला स्व. श्री रतनलालजी बाफना यांनी तन मन धन इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष आपल्या जीवाचीही बाजी लावली !
स्व. श्री रतनलालजी बाफना आणि त्यांच्या सुवर्णपथाचा मार्ग सोपा नव्हताच. प्रत्येक सुवर्णाला अग्निदिव्यातून जावे लागते तसे रतनलालजींना देखील सुवर्ण कसोट्यांवर तावून सुलाखून निघावे लागले. परंतु सुवर्ण व्यवसाया प्रति त्यांची निष्ठा, कल्पकता आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांचा ध्यास, चिकाटी आणि धडाडीने नवा सुवर्ण इतिहास रचला याचे साक्षीदार समस्त जळगावकर आहेत. ते खरोखर एक किमयागार होते. सुवर्णव्यवसाय त्यांनी समर्पित होऊन आत्मसात केला आणि त्यांच्या आगामी पिढ्यांमध्येही रुजवला. आपल्या व्यवसायाला तीर्थस्थानाप्रमाणे पवित्र आणि निर्मळ तर ठेवलेच, जळगावला ‘ सुवर्ण नगरी ‘ म्हणून लौकिकाही प्राप्त करवून दिला. जळगाव ही त्यांची कर्मभूमी आणि प्रयत्नभूमी ठरली. व्यवसाय आणि सामाजिक उपक्रमांना राबवताना त्यांनी अक्षरशः वाळूचे कण रगडले आहेत. अपार कष्टाळू, धर्माचे तंतोतंत पालन करणारे, वक्तशीर आणि शिस्तबद्ध असलेले रतनलालजी सौंदर्य आणि कलेचे उपासक होते. व्यवसायात केवळ धनार्जन करून ते थांबले नाहीत. अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी पुण्यार्जनही केले आहे.
जळगांवला 2 सुवर्णदालने व 1 सिल्वर दालन, औरंगाबाद, नाशिक, नांदेड, पुणे आणि कोल्हापूरचे शो- रूम्स हे त्यांचे व्यावसायिक; तर अहिंसा -शाकाहार चळवळ, गोशाळा; ज्यात कसायीखान्यातून सोडवलेल्या गायीचे पुनर्वसन, गायींना आत्मनिर्भर बनवणारे अनुसंधान केंद्राचे संचालन, पेयजलांचे प्याऊ, क्षुधा शांती केंद्र, नेत्र रुग्णालय आणि नेत्र पेढीची चळवळ, अंध- अपंग आणि दिव्यांग बांधवांसाठी हॉस्पिटल्स आणि भरभरून मदत हे त्यांचे सामाजिक योगदान होत. जळगांव येथील दीपस्तंभच्या मनोबल केंद्राला 3 एकर जमीन व 1 कोटी रुपयांची मदत केली. ही यादी खरे तर लांबतंच जाणारी आहे. अखिल भारतीय जैन रत्नसंघाचे अध्यक्षपद त्यांनी ६ वर्षे भूषवले. त्या कार्यकाळात संघाला पंचसूत्रे त्यांनी दिली आणि धर्मप्रचाराला वाहून घेतले होते. रतनलालजीनी अनेक धार्मिक सत्संग आयोजीत केले, तसेच सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमही !
ज्यात प्रामुख्याने हास्य कवि सम्मेलन : दर वर्षी ३१ डिसेंबरला लागोपाठ ६ वर्षे आयोजित केले. आदर्श सास बहू स्पर्धा, औरंगाबाद मध्ये विसुभाऊ बापट यांचे ‘ कुटुंब रंगलय काव्य असे अनेक कार्यक्रमांचे सफल आयोजन केले , ज्यातून त्यांनी समाजातील सर्व घटकांशी जवळीक साधली, स्नेह जोपासला.
धर्माला कर्माची जोड देऊन ज्यांनी मानवतेची पताका फडकवली असे अहिंसेचे उपासक श्री रतनलालजी म्हणजे जळगावच्या शिरपेचात रोवलेला मानाचा रत्नच ! त्यांचे जळगावला कर्मभूमी मानणे हे जळगावच्या सुवर्णाध्यायात सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखे पर्व आहे ! त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी त्यांच्या स्मृतींना शत शत नमन !
-मनोहर नारायण पाटील
मोबा.- 9420350250