धुळे : लग्न झाल्यानंतरही आपल्या जुन्या प्रियकरासोबत प्रेमसंबंध सुरू असलेल्या एका महिलेनं आपल्या पतीला संपवण्यासाठी खुनी खेळ रचल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पण आरोपी महिलेचं माहेरकडील मंडळींसोबत झालेलं मोबाइलवरील संभाषण आणि सोशल मीडियावरील चॅटींगमधून भयंकर सत्य समोर आलं आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकरासह सहा जणांविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
31 वर्षीय पीडित तरुणाच्या फिर्यादीवरून, पोलिसांनी आरोपी पत्नी, प्रियकर आणि सासू-सासऱ्यांसह सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील वडजाई येथील रहिवासी असलेल्या 31 वर्षीय तरुणाची काही दिवसांपूर्वी अमळनेर येथील एका तरुणीशी विवाह झाला होता.
पण फिर्यादीच्या पत्नीने लग्नानंतरही प्रियकर लक्ष्मीकांत हिम्मतराव अहिरे याच्याशी प्रेमसंबंध कायम ठेवले होते. फिर्यादी पती हा अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता. त्यामुळे आरोपी महिलेनं आपला प्रियकर आणि सासरच्या मंडळीच्या संगनमताने पतीच्या हत्येचा कट रचला होता. आरोपींनी फिर्यादीला ठार मारण्यासाठी त्याला जेवणातून विषारी अपायकारण औषधी द्रव्य दिलं होतं. यामुळे फिर्यादीच्या पोटातील आतड्यांना सूज देखील आली.
दरम्यान, फिर्यादीने अचानक आपल्या पत्नीचा मोबाइल चेक केला असता, त्याच्या आतड्याला सूज येण्यामागच्या कारणाचा खुलासा झाला आहे. पत्नीच्या मोबाइलमधील तिच्या माहेरच्या मंडळींशी झालेलं संभाषण आणि सोशल मीडियावरील चॅटीगमधून महिलेचं बिंग फुटलं आहे. सासू आणि सासऱ्याचा देखील आरोपी महिलेला पाठींबा असल्याचं चॅटींगमधून स्पष्ट झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी तरुणाने मोहाडी पोलीस ठाण्यात आरोपी पत्नी, तिचा प्रियकर लक्ष्मीकांत हिम्मतराव अहिरे, सासू- सासऱ्यांसह सहा जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.