मुंबई : मोसमी पाऊस या आठवड्यात राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्या भागांमध्ये हायअलर्ट?
राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (5 ऑक्टोबर) रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधार वापसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, काल सायंकाळी पुणे शहरात परतीचा मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा जोर इतका होता की अवघ्या दोन तासांमध्ये शहरातील अनेक भाग जलमय झाले. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात पाणी साचले होते. या परिसरातील तुकारामशेठ शिंदे वाहनतळाचा तळमजला अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहनतळावर लावण्यात अलेलल्या सुमारे 300 ते 400 दुचाकींचे नुकसान झाल्याचे समजते.