मुंबई : मिस्टर इंडिया मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विषारी गोळ्या खाऊन 29 वर्षीय मनोजने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. बुधवारी रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं. सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी मनोज पाटील याने एक सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये त्याने अभिनेता साहिल खान याच्यावर गंभीर आरोप केला आहे.
अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून साहिल खान आपल्याला विनाकारण त्रास देतो आणि सोशल मीडियात बदनामी करतो त्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचं मनोजने म्हटलं आहे.
मनोज पाटील याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांत भाग घेतला आहे. मनोज पाटील याने इतकं टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मनोज पाटील याचे कुटुंबीय मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कोण आहे मनोज पाटील?
मनोज पाटीलने 2016 मध्ये ‘मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ हा किताब पटकावला होता. तो एक सुप्रसिद्ध मॉडेल, अॅथलीट आणि ट्रेनरही आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या स्वप्नांचा मागोवा घेत तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.