यावल प्रतिनिधी | यावलमध्ये एका उच्चशिक्षित २३ वर्षीय तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. सादिक गनी तडवी (वय २३) असे या मृत तरुणाचे नाव असून त्यास भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. तेथे त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी त्याचा मृत्यू झाला.
उच्चशिक्षित तरुण सादिक तडवी हा काही दिवसांपासून आजारी होता. ताप कमी होत नसल्याने त्याला भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. तेथे त्याची तपासणी केली असता डेंग्यूची लागण झाल्याची पुष्टी मिळाली होती. नगरपालिकेने दक्षता म्हणून विस्तारित भागात तातडीने धुरळणी व फवारणी करत स्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी होत आहे. मृत सादिक हा कुटुंबात एकुलता एक होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.















